जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटूंब योजनेत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्याने रेशनकार्ड उपलब्ध करुन देणेसाठी नियोजनबध्द कार्यक्रम राबविण्याचे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी आज दिलेत.
येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात मंत्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक बी. जी. जाधव, जिल्हा मार्केटींग अधिकारी एन. डी. मगरे, विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार साहेबराव शिंदे, वैधमापनशास्त्र विभागाचे निरिक्षक सी. डी. पालीवाल, रविंद्रभैय्या पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मंत्री भुजबळ म्हणाले की, अंत्योदय योजनेत जिल्ह्यातील दिव्यांग, विधवा, परितक्त्या, भुमीहीन शेतमजूर, अल्पभुधारक शेतकरी, दुर्धर आजारग्रस्त, आदिवासी व्यक्ती, ६० वर्षावरील वृध्द ज्यांना कुठलाही आधार नाही तसेच दारिद्रय रेषेखालील नागरीकांचा समावेश करुन त्यांना या योजनेतंर्गत धान्याचा लाभ द्यावा. ज्या लाभार्थींनी गेल्या वर्षभरात धान्य घेतलेल नाही त्यांची यादी तयार करावी. तसेच गरजूंना धान्याचा लाभ देण्यासाठी धोरण आखावे, रेशनच्या मालाची अफरातफर होत असल्याचे आढळून आल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सुचनांही त्यांनी यावेळी दिल्यात.
शिवभोजन केद्राच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. शिवभोजन केंद्रांना नियमितपणे भेट देऊन तेथील तपासणी करावी. गरजू नागरीकांची शिवभोजनची गरज लक्षात घेऊन केंद्र वाढविण्यात यावेत. प्रत्येक केंद्रासाठी इष्टांक एकसारखा राहील याची दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. भरडधान्य केंद्रावर नावनोंदणीची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपत आहेत. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही मंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ५७ टक्के लाभार्थी प्राधान्य कुटूंब योजनेत समाविष्ठ आहेत. आगामी काळात तीन महिन्याच्या धान्याची उचल करावयाची असल्याने पाळधी येथील गोडावून भाड्याने घेणे आवश्यक असून त्याबाबतचा तसेच अमळनेर व पाचोरा येथे गोडावून बांधण्याचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे. त्यास मंजूरी मिळावी तर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना दिलेले ई-पॉस मशीन हे जुने झालेले आहेत ते बदलून मिळावे, तसेच सध्या जिल्ह्यात ४८ शिवभोजन केंद्र सुरु असून त्यामध्ये दररोज ४६०० थाळ्यांचे वाटप करण्यात येत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुर्यंवशी यांनी सांगितले. तर जिल्ह्यात सध्या १७ भरडधान्य खरेदी केंद्र सुरु असून नांवनोंदणीसाठी मुदत वाढून मिळण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत असल्याचे जिल्हा मार्केटींग अधिकारी मगर यांनी बैठकीत सांगितले.