जळगाव (प्रतिनिधी) पारंपारीक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे. खरीपासाठी उत्कृष्ट दर्जाचे बीयाणे मिळावे तसेच खते व पीककर्ज वेळेवर उपलब्ध होईल याकरीता सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ते नियोजन करावे. शेतकऱ्यांनी 1 जून नंतरच पेरणी करावी खरीप हंगाम तोंडावर असतांना बोगस बियाणांची विक्री करणार्या दुकानांचा परवाना रद्द करण्यात यावा, पावसाविषयीचे अंदाज, माहिती खेडोपाडी सर्वदूर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. पावसाचे अंदाज शेतक-यांना वेळोवेळी कळत राहिले तर दुबार पेरणीची वेळ किंवा इतरही नुकसान टळेल. त्यादृष्टीने शेतक-यांमध्ये सातत्यपूर्ण जाणीवजागृती करावी तसेच अवकाळी पावसाने वीजपुरवठा यंत्रणेचे नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणने आवश्यक दुरुस्त्या, विस्तार व इतर कामे वेळेत पूर्ण करावी, गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हास्तरीय हंगामपूर्व आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देत बोगस बियाणे व खतांबाबत विशेष दक्ष राहण्याचे बजावले. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा विश्रामगृहात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. खरीप हंगामपूर्व माहितीचे सादरीकरण जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले.
या बैठकीस सर्वश्री.आ. चिमणराव पाटील आ.एकनाथराव खडसे, आ.संजय सावकारे, जिल्हाधिकारी अमन मित्तल ,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषि अधिकारी वैभव शिंदे आदि उपस्थित होते. तर यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कापूस बियाणे मागणी व नियोजन,रासायनिक खतांचा वापर, प्रधानमंत्री पिक विमा योजना व पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना, मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया योजना, कृषि यांत्रिकीकरण योजनेतंर्गत कृषी औजारे वाटप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा), चार्याची आवश्यकता व उपलब्धता, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, नैसर्गिक आपत्ती नुकसानाबाबत जिल्हास्तरीय हंगामपूर्व आढावा बैठकीत आढावा घेऊन सविस्तर माहिती जाणून घेतली. खरीप हंगामपूर्व माहितीचे सादरीकरण जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले. त्यांनी सन 2022-23 व सन 2023- 24 मधील योजना निहाय उदिष्ट व सद्यस्थिती ची माहिती विषद केली. आभार जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषि अधिकारी वैभव शिंदे यांनी मानले. यावेळी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले की खरीप हंगामासाठीची आवश्यक ती माहिती व शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यात एकूण वहितीखालील क्षेत्र 8.48 लाख हेक्टर असून खरिप क्षेत्र 7.70 लाख हेक्टर आहे. जिल्ह्यातील प्रमुख पिकांत कापसाचे प्रस्तावित क्षेत्र 5.50 लाख हेक्टर, व इतर 2.13 लाख हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. यानुसार एकूण प्रस्तावित क्षेत्र 6.63 लाख हेक्टर आहे. शेतकऱ्यांनी खरीप पूर्ण मशागतीची कामे करतांना स्वताची काळजी घ्यावी , शक्यतोवर सकाळीच शेत शिवारातील कामे उरकून घ्यावी. एकाच पिकावर विसंबुन न राहता मुख्य पिकाबरोबर आतंरपीक व मिस्त्रपिक घ्यावे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केलल्या बीयाणे, खतांचे पक्के बील विक्रेत्याकडून घ्यावे. जिल्हा व तालुकास्तरावरभरारी पथकांची स्थापना करण्यात बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांना व खतांचा कृतीम टंचाई करणाऱ्या वर कृषी अधिकारी यानी धडा शिकविण्यासाठी कठोरात कठोर कारवाई करावी. बियाणे व खते बाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तक्रार घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावा.
अधिकाऱ्यांनी तालुका पातळीवर आवश्यक त्या ठिकाणी नवीन हवामान यंत्र अपडेट करून मनेरगा किंवा इतर शासनच्या योजना मधून शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनाची माहिती पोहचून लाभ देण्याबाबत तत्पर राहा. लोड शेडींग बंद असून महावितरणाने शेतीसाठी अखंड वीज पुरवठा करण्याबाबत दक्ष राहावे . पर्जन्यमानाची अनिश्चितता लक्षात घेता जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. ही कामे युद्धस्तरावर राबवून मे महिनाअखेरपर्यंत पूर्ण करावीत. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना प्रभावीपणे राबवावीबागायती कापूस पीकाची लागवड करताना शेतकऱ्यांना पीकाला पाणी देता यावे याकरीता वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना लागवडीच्या काळात पुरेशी वीज उपलब्ध करुन द्यावी. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी पहिल्या टप्प्याचा निधी वितरित होत आहे. उर्वरित दोन टप्प्यातील निधीही तत्काळ वितरित करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने वेळोवेळी तातडीने मदत जाहीर केली आहे. मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळीचा आपल्या जळगाव जिल्ह्यातील 18 हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने 20 कोटी 42 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.यावेळी तालुका स्तरावर शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात याव्यात असे आ.चिमणराव पाटील व आ.एकनाथराव खडसे यांनी सूचित केले.
कर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी सहकार्य करा
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक मार्फत ,728 कोटी 94 लक्ष पिक कर्ज वाटप उदिष्टपैकी 48 % म्हणजे 348 कोटी 86 लक्ष पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर राष्ट्रीयकृत बँक ( 860 कोटी 96 लक्ष ), ग्रामीण बँक ( 26 कोटी 32 लक्ष) व खाजगी बँक (323 कोटी 35 लक्ष ) असे पिक कर्ज वाटप उदिष्ट असताना अद्याप पर्यंत दमडीही पिक कर्ज वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे सर्व बँकांमार्फत एकूण 1939 कोटी 58 लक्ष उदिष्ट असून त्यापैकी केवळ 348 कोटी 86 लक्ष पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षी सर्व बँकांमिळून 2 लक्ष 42 हजार 204 शेतकऱ्यांना 2149 कोटी उद्दिष्टापैकी 1794 कोटी 39 लक्ष म्हणजे 84 % पिक कर्ज वाटप करण्यात आले होते. कर्ज वाटपा मध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ना.गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार यावर्षी गुणवत्ता नियंत्रण कार्यवाहीसाठी निरिक्षक निहाय व महिना निहाय नियोजन केलेले असून जिल्ह्यातील बियाणे खते व कीटक नाशके उत्पादन स्थळ व साठवणूक स्थळ तपासणी तसेच जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील उत्पादकांचे साठवणूक स्थळ तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे एकूण 16 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले विविध कामांचे उद्घाटन व वाटप
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बांधावर 10 टन खताचे वाटप करण्यासाठी हिरवी झेंडी दाखविण्यात आली. कृषि यांत्रिकीकरण योजनेतंर्गत जिल्ह्यातील 5 हजार 45 लाभार्थ्यांना 31 कोटी 24 लाख रुपयांचे ट्रंकतर, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, नांगर व अनुषंगिक औजारे अनुदान प्रातनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकाची पाहणीही मान्यवरांनी केली. खरीप हंगाम सन 2022 राज्यस्तरीय ज्वारी पिक अंतर्गत शासनाने निवड केलेल्या ज्ञानेश्वर चिंतामण पाटील गहुखेडे ता. रावेर व अर्जुन दामू पाटील वडगाव ता, रावेर या शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सन्मान करण्यात आला.
पोकरा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोकरा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात एकूण ४६० गावांची निवड करण्यात आली असून आज पावेतो जिल्ह्यातील १ लक्ष ०४ हजार ३९५ शेतकऱ्यांची नोंदणी केलेली असून त्यापैकी आज पावेतो ७० हजार ३०१ शेतकरी बांधवांना रक्कम रुपये ४९९ कोटी ८८ लक्ष इतका रकमेचे अनुदान वितरित करण्यात आलेला आहे. तसेच ६२१३लाभार्थ्यांचे ५७ कोटी २१ लक्ष चे अनुदान वितरण अंतिम टप्यात आहे. यात ठिबक सिंचन संच ,शेळी पालन , शेडनेट गृह ,शेततळे, पौलीहाउस, इलेक्ट्रिक मोटारपंप ,फळबाग व वनिका आधारित शेती,,पाईप , रेशीम उद्योग अश्या 22 प्रकारच्या बाबींवर रुपये ४९९ कोटी ८८ लक्ष इतके अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलेले आहे. त्यामुळे पोकरा योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.