जळगाव (प्रतिनिधी) जळगावकरांसाठी एक ऐतिहासिक आणि मंगलमय संधी येत्या ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक ८:०१ वाजता, खान्देश सेंट्रल ग्राउंड येथे विश्व नवकार महासंमेलन दिन आयोजित केला आहे. या पवित्र आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व धर्मीय बंधू-भगिनींना JITO जळगावच्या वतीने निमंत्रण देण्यात येत आहे.
‘विश्व कल्याणासाठी एकत्र येऊया आणि नवकार महामंत्राचा सामूहिक जप करून शांती आणि सद्भावनेचा संदेश देऊया !’ या उद्देशाने विश्वशांतीसाठी सामुदायिक नवकार महामंत्र जप हा दिवस केवळ जळगावसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक विशेष पर्वणी आहे. या दिवशी सामुदायिक नवकार महामंत्राचा जप आयोजित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, एकाच वेळी १०८ देशांमध्ये आणि भारतातील ६००० ठिकाणी हा शांतीमंत्र गुंजणार आहे.
या कार्यक्रमाची महती आणखी वाढवणारी बाब म्हणजे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील ऑनलाइनच्या माध्यमातून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असतील. नवकार महामंत्र शांती आणि सद्भावनेचा दिव्य संदेश दिला जाणार आहे. नवकार महामंत्र, केवळ एक प्रार्थना नाही, तर तो संपूर्ण जगासाठी शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. या मंत्राच्या माध्यमातून आपण अनेक आध्यात्मिक विभूतींना वंदन करतो.
नवकार मंत्राचा अर्थ
णमो अरिहंताणं – अर्थात, ज्यांनी संपूर्ण ज्ञान प्राप्त केले आहे, त्या अरिहंतांना आमचे नमन.
णमो सिद्धाणं – मोक्षपदाला पोहोचलेल्या सिद्धांना आमचा प्रणाम.
णमो आयरियाणं – धर्माचे मार्ग दाखवणारे आचार्यांना आमचे वंदन.
णमो उवज्जायाणं – आध्यात्मिक गुरुंना आमचा नमस्कार.
णमो लोए सव्व साहूणं या जगात असलेल्या सर्व साधू-संतांना आमचे विनम्र अभिवादन.
या भव्य कार्यक्रमाचे आयोजन JITO जळगावच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या पवित्र कार्यात जिल्ह्यातील सर्व धर्मीय धर्मगुरु, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तसेच सर्व समाजातील, प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. JITO जळगावचे अध्यक्ष सुभाष लोढा, चीफ सेक्रेटरी प्रशांत छाजेड आणि प्रोजेक्ट चेअरमन विनय पारख यांनी जळगाव शहरातील सर्व नागरिकांना या पवित्र आणि ऐतिहासिक क्षणी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.