जळगाव (प्रतिनिधी) राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळविले आहे. मात्र, या निकालावरुन विरोधकांनी मात्र ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. याच्याशीच निगडित जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यासह महाविकास आघाडीच्या अन्य दोन उमेदवारांनी ईव्हीएम आणि वीवीपॅडच्या फेर तपासणीसाठी अर्ज केला आहे.
एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघातील शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार तथा माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील ३ मतदान केंद्रांवरील, पाचोरा-भडगाव मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांनी ८ तर मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांनी १६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि वीवीपॅडच्या फेर तपासणीसाठी अर्ज केले आहे. यासाठी लागणारी रक्कमही त्यांनी भरल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
निकाल लागल्यानंतर ४५ दिवसांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तज्ञांमार्फत तपासणी होणार आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रामागे ४० हजार रुपये अधिक १८ टक्के जीएसटी शुल्क भरावे लागते. त्यानुसार तिघ उमेदवारांनी एकूण २७ केंद्रांसाठी १२ लाख ७४ हजाराची रक्कम भरली आहे.
तीनही उमेदवारांनी शुल्क भरून तपासणी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
आयुष प्रसाद
(जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी)
माझ्या विरोधातील उमेदवाराने दोन दिवस आधीच त्यांना कोणत्या बूथवर किती मतदान मिळेल?, याबाबतची यादी सोशल मीडियात व्हायरल केली होती आणि त्यानुसारच प्रत्येक बुथवर संबंधित उमेदवाराला मते मिळाली आहेत, हे सगळं संशयस्पद आहे.
अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये देखील बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जातात. मग भारतातच सरकार बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला का घाबरते? त्यांनी एकदा भेटते बरोबर निवडणुका घेऊन दाखवाव्यात, मग सर्व एकदा सर्व स्पष्ट होईल.
रोहिणी खडसे
(पराभूत उमेदवार मुक्ताईनगर-बोदवड विधानसभा मतदार संघ)