पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातल्या ऐतिहासिक लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याने वाद निर्माण झाला असून वैष्णवी पाटीलसह तिघांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता हे प्रकरण चिघळत जात असल्याचं पाहून वैष्णवी पाटीलने जाहीर माफी मागितली आहे.
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पुनित झालेल्या पुण्यनगरीतील लाल महालात नृत्यांगना वैष्णवी पाटील हिने काही दिवसांपूर्वी लावणीचा व्हिडिओ शूट केला होता. दिग्दर्शक प्रसाद ओक च्या चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा या गाण्यावर वैष्णवी थिरकताना दिसली. महालातील मध्यवर्ती ठिकाणी वैष्णवी बेभान होऊन नाचली. यानंतर संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप नोंदवला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर वैष्णवी पाटीलसह तिघांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय म्हणाली वैष्णवी पाटील
१३ तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये माफी मागत वैष्णवी म्हणाली की, ‘एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. कारण तुम्ही आहात म्हणून मी आहे. काही दिवसांपूर्वी लाल महालात मी चंद्रा गाण्यावर व्हिडिओ केला होता. मी जेव्हा तो व्हिडिओ केला तेव्हा माझ्या ध्यानीमनीही पुढे असं काही होईल याचा विचार आला नाही. पण ती चूक माझ्याकडून झाली आणि ती मी मान्यही करते. तुमच्याप्रमाणेच मीही एक शिवप्रेमी आहे. जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेस ठेच पोहचवण्याचा माझा कधी हेतू नव्हता आणि पुढेही नसेल. यासाठी मी सर्वांची जाहीर माफी मागते.