पुणे (वृत्तसंस्था) मित्राशी झालेल्या वादातून महाविद्यालयीन तरुणीने त्याच्यावर स्वयंपाक घरातील चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना वाघोली परिसरात घडली. यशवंत मुंडे (वय २२, मूळ रा. लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, झटापटीत संशयित आरोपी अनुजा पन्हाळे (वय २१, रा. कोलार, जि. अहमदनगर) ही देखील जखमी झाली आहे.
यशवंत आणि अनुजा वाघोली परिसरातील रायसोनी महाविद्यालयात डेटा सायन्स अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत. परीक्षा सुरू असल्याने दोघे एकत्रित अभ्यास करायचे. यशवंत हा महाविद्यालयाजवळ भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. रविवारी रात्री अनुजा त्याच्या खोलीवर अभ्यासासाठी गेली होती.
दोघांनी रात्रभर अभ्यास केला. परंतू सोमवारी पहाटे यशवंत आणि अनुजा यांच्यात वाद झाला. यावेळी अनुजाने स्वयंपाकघरातील भाजी कापण्याच्या चाकूने यशवंतवर वार केले. झटापटीत तिलाही दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या यशवंतला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, यशवंत आणि अनुजा यांच्यात प्रेमसंबंध होते. परंतू यशवंत याचा स्वभाव रागीट होता. त्यामुळे अनुजाने त्याच्यासोबत प्रेम संबंध पुढे चालू ठेवण्यास नकार दिला होता आणि ती त्याला वारंवार टाळत होती. या गोष्टीवरून यशवंत याला राग आला होता. त्यामुळे अनुजा त्याच्या घरी आली असताना दोघांमध्ये सोमवारी पहाटे वाद झाले त्यानंतर अनुजा हिने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने त्याच्या पोटात, डोक्यात आणि पाठीवर वार केल्याची माहिती समोर आली आहे.