नागपूर (वृत्तसंस्था) सावनेर स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी येथून पंचमुखी हनुमानमंदिरात लग्नाला जाणाऱ्या बापलेकांच्या दुचाकीला चारचाकीने चिरडल्याने दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना ५ मे रोजी रात्री आठ वाजता बाभूळखेडा मार्गावरील कोल्हार नदीच्या पुलावर घडली.
प्रमोद श्यामराव चौधरी (५२) व पूर्वेश प्रमोद चौधरी (१८, दोघेही रा. पाटणसावंगी) अशी मृत बापलेकांची नावे आहेत. पाटणसावंगी येथून बाभूळखेडा मार्गान इनोव्हा कार क्रमांक एमएच २९/ टी ९१९१ ही वेगाने येत होती, तर त्याच मार्गावरून दुचाकी क्रमांक एमएच ४०/एम १४४५ सुद्धा येत होती. भरधाव इनोव्हाने दुचाकीला मागून धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, दुचाकी २५ ते ३० फूट खोल कोल्हार नदीच्या पुलाखाली फेकल्या गेली. यात बापाचा जागीच मूत्यू तर मुलाचा नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ता हितेश बन्सोड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला प्राथमिक आरोग्यकेंद्र पाटणसावंगी येथे नेले. तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे जखमीचा मृत्यू झाला, अशी तक्रार नातेवाईक आणि गावकऱ्यांनी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सावनेर रुग्णालयात पाठविले.
सोमवारी दुपारी दोघांच्या पार्थिवावर सोबतच येथील संगमेश्वर घाटावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने ताब्यात घेऊन फरार अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.