नागपूर (वृत्तसंस्था) नागपुरातील एका खासगी रुग्णालयात मुलीला उपचारासाठी नेणाऱ्या दाम्पत्याला वर्धा मार्गावरील जामठा शिवारात बेलेजा सर्व्हिस सेंटरसमोर भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले. या अपघातात पतिपत्नीचा जागीच मृत्यू तर १३ वर्षीय मुलगी जखमी झाली. ही घटना २ डिसेंबरला सकाळी घडली. दिलीप डोमाजी लेंडे (४५), सारिका दिलीप लेंडे (४०, दोघेही रा. संताजीनगर, बुटीबोरी) अशी मृतक पतिपत्नीची नावे आहेत.
लेंडे दाम्पत्याला १३ वर्षीय लावण्या नामक गतिमंद मुलगी आहे. ते आपल्या दुचाकीने तिला नागपूरला नेत असताना जामठा शिवारात मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीला काही अंतरापर्यंत फरपटत नेले. या अपघातात दुचाकीचालक दिलीप व पत्नी सारिका यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी लावण्या जखमी झाली. यावेळी रस्त्याने येजा करणाऱ्या वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली.
नागरिकांच्या मदतीने जखमी मुलीला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. मात्र चालक पसार झाला. मृतकाचा मुलगा अमृत लेंडे याच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.