नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ने भारतात निर्मित करण्यात आलेल्या भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीला आपत्कालीन उपयोगासाठी मंजुरी दिली आहे. यासोबतच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया निर्मित ऑक्सफर्डच्या ‘कोविशिल्ड’ लसीलाही आपत्कालीन उपयोगासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ लसीला दिलेल्या मंजुरीवरुन काँग्रेस नेत्यांनी सवाल उपस्थित केले आहेत.
काँग्रेस ज्येष्ठ नेते जयराम रमेश व शशी थरूर यांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी ट्विट करत ‘कोव्हॅक्सिन’च्या आपत्कालीन उपयोगावर प्रश्न उपस्थित करत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं, “कोव्हॅक्सिन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप घेतलेली नाहीये. त्यापूर्वीच लसीच्या उपयोगासाठी मान्यता देणे धोकादायक ठरू शकते. डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्टीकरण द्यावे. काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनीही अशाच प्रकारे प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं, “आश्चर्या वाटते की, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीशी संबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रोटोकॉलचे उल्लंघन करण्यात आले. आरोग्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे.”
या अगोदर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी वॅक्सीनबाबत शंका उपस्थित केली होती. तसेच, मी ही लस टोचवून घेणार नाही, भाजपाच्या लसीवर आम्ही कसा काय विश्वास ठेवू? असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आज त्यांनी आपली भूमिका बदलल्याचं दिसून आलं. लसीकरणास लवकरात लवकर सुरूवात व्हावी, असं अखिलेश म्हणाले आहेत. तसेच, समाजवादी पार्टीचे आमदार आशुतोष सिन्हा यांनी देखील करोना वॅक्सीनबद्दल आज वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. या वॅक्सीनमुळे तुम्ही नपुंसक होऊ शकतात असं खळबळजनक विधान सिन्हा यांनी केलं आहे.
दरम्यान, दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आल्याचे आज डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन सांगितल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण असल्याचं म्हणत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने भारतात निर्मित करण्यात आलेल्या दोन कोरोना लसींना आपत्कालीन उपयोगासाठी मान्यता दिली आहे. ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ लसींना मान्यता मिळाल्यामुळे आता देशभरात कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच लसीकरणाला सुरुवात होईल.