अमळनेर (प्रतिनिधी) बजाज फायनान्स ऑफिसमध्ये राडा शिंदे गटाचे अमळनेर (Amalner) तालुकाप्रमुख प्रथमेश पवार यांना चांगलाच भोवला आहे. पवारांसह दोघांसह पाच ते सहा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. (Bajaj Finance)
या संदर्भात अधिक असे की, शिंदे गटाचे तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांच्या आई सुरेखाबाई मधुकर पवार (रा. ढेकू रोड, अमळनेर) यांनी बजाज फायनान्स अमळनेर शाखेकडून ४ लाख २७ हजार रुपये कर्ज घेतले होते. त्याचा हप्ता दरमहा भरण्याचे ठरले असताना डिसेंबर महिन्याचा हप्ता खात्यात रक्कम शिल्लक नसल्याने हप्ता बाऊन्स झाला होता. यानंतर ललित सूर्यवंशी, जयेश कदम हे बजाज फायनान्स कर्मचारी ईएमआय रक्कम घ्यायला गेले होते. परंतू यावेळी प्रथमेश पवार याने १० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत देतो असे सांगितल्याने कर्मचारी परत आले होते.
यानंतर १० रोजी सायंकाळी प्रथमेश पवार, सनी सुरेंद्र अभंगे व सचिन सुरेंद्र अभंगे दोन्ही (रा. चोपडा नाका, अमळनेर) यांच्यासह पाच ते सहा तरुण महाराणा प्रताप चौक न्यू प्लॉट येथील बजाज फायनान्स कार्यालयात घुसले व शिविगाळ करत हातातील लाकडी दंडक्याने खुर्च्या ,लॅपटॉप ,संगणक असे साहित्याची तोडफोड सुरू केली. तसेच ड्रॉवर मधील बाऊन्स व ऍडव्हान्स हप्त्याची ठेवलेले ९६ हजार १४५ रुपयांपैकी ८६ हजार ३९० रुपये आणि हिशोबाची चिट्ठी काढून घेतली. आणि माझ्या घरी वसुलीला आले तर पाहून घेईल अशी धमकी देऊन कपाट, कुलर, व्हीलचेअर, सीसीटीव्ही कॅमेरे असे दोन अडीच लाखांचे नुकसान केले. बजाज फायनान्सचे अधिकाऱ्यांनी फिर्याद दिल्यावरून दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे हे करीत आहेत.