नाशिक (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करत शिवसैनिकांनी कार्यालय फोडले. तर दुसरीकडे राणेंच्या पोस्टरवर सांगलीत शाईफेक केली आहे.
जुन्या नाशिकमध्ये भाजपचे वसंत स्मृती हे अलिशान कार्यालय आहे. शिवसैनिक गाडीत बसून आले आणि त्यांनी भाजपच्या कार्यालयावर प्रचंड दगडफेक केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केलेली असतानाच सांगलीतही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. शिवसैनिकांनी राणेंच्या पोस्टरला काळे फासून आपला निषेध नोंदवला. यावेळी शिवसैनिकांनी राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.