नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, वायनाडचे खासदार 23 मार्च 2023 पासून लोकसभेसाठी अपात्र ठरले आहेत. (Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha)
राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019मध्ये कर्नाटकाच्या कोलार येथे प्रचंड जाहीर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. या रॅलीत त्यांनी मोदींची तुलना थेट नीरव मोदी आणि ललित मोदी यांच्याशी केली होती. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी सर्वांची आडनावे एक समान कशी? सर्व चोरांची नावे मोदी का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. मोदी आडनावावरुन वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी मानहानी केली असून ते त्यात दोषी आढळले असे सूरत कोर्टाने म्हटले होते. त्यानंतर कोर्टाने त्यांना मानहानी गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. 2019 रोजी कर्नाटकातील एका सभेत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांच्यावर सूरत येथे गुन्हा दाखल झाला होता. 2019 मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी कर्नाटकमधील कोलार येथे राहुल गांधी यांची सभा होती.
यावेळी त्यांनी मोदी यांच्या नावावरुन वादग्रस्त विधान केले होते. देशातील सर्वच घोटाळ्यातील आरोपींचे नाव मोदी आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. याप्रकरणी भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांच्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याचा आरोप मंत्री पूर्णेश मोदी यांनी केला होता. दरम्यान, देशातील कोणत्याही सक्षम न्यायालयाने कुणाही लोकप्रतिनिधीला किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्याचं संसद सदस्यत्व त्याचक्षणी रद्द होईल असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याचाच आधार घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे.