मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय संघटनांवर मोठे आरोप केले आहेत. यानंतर आता राहुल गांधी यांनी राऊतांना पत्र लिहून मी तुमच्या पाठिशी असल्याचं सांगितलंय.
संजय राऊतांनी फेब्रुवारी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडूंना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात राहुल गांधी यांनी संजय राऊतांना काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. पत्रात राहुल गांधी यांनी संजय राऊतांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना ८ फेब्रुवारीला लिहिलेल्या पत्राची दखल घेतली आहे.
तपास यंत्रणांकडून तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना टार्गेट केलं जात असल्याचा मी निषेध करत असून तुमच्या पत्रातून मोदी सरकार विरोधकांना शांत करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा खुलासा झाला आहे. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असून कोणतीही भीती आणि अनुकूलता न दर्शवता तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवत आहोत असं राहुल गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी लिहिलेलं पत्र संजय राऊत यांनी ट्वीटरला शेअर केलं असून त्यांचे आभार मानले आहेत. लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या या आमच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला एकत्र लढावे लागेल. केंद्रीय तपास यंत्रणा एका पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागत आहेत हे केवळ दुर्दैवी नाही तर धोकादायकही आहे. पण मला खात्री आहे, ही वेळ सुद्धा निघून जाईल असं संजय राऊत म्हणाले आहेत.