जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बुधवारी रावेरातील दोन धान्य गोदामावर अचानक छापा टाकल्यामुळे रेशन माफियांमध्ये एकच खळबळ उडाली. धान्य गोदामात गहू, तांदूळ व ज्वारी असे धान्य आढळून आल्यानंतर दोन्ही गोदामे सील करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी मित्तल हे बुधवारी रावेर तालुक्यात केळी पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेले होते. या वेळी बहाणपूर रोडवरील रावेर येथील विलास चौधरी यांच्या चौधरी ट्रेडर्स व कय्यूम ब शेख यांच्या गोदामांवर धाड टाकून तपासणी केली. या गोदामांत गोण्या तांदूळ व २०० गोण्या गव्हाचा संशयास्पद साठा आढळून आला. त्यामुळे दोन्ही गोदामे सील करण्यात आली.
दरम्यान, जी. एस. कॉलनी परिसरातील एका गोदामात खाली बारदान, तर बालाजी टोलनाक्याजवळील कय्युम शेख याच्या गोदामात १२ ते १५ क्विंटल तांदूळ आढळून आला. हा तांदूळ त्यांनी कोठून आणला याबाबत समाधानकारक माहिती देता आली नाही, त्यामुळे हे गोदाम देखील सील करण्यात आले. दरम्यान, जप्त धान्य साठा हा स्वस्त धान्याचा आहे किंवा नाही?, यासंदर्भात अधिकची माहिती चौकशीतूनच समोर येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी धरणगाव तालुक्यातील गोदामावर देखील धाड टाकली होती. ते गोदाम देखील सील करण्यात आले होते.