भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील एका बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत पथकाने २३ हजार ८६८ रुपयांची औषधी जप्त केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बोगस डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी ही कारवाई केली.
शमशीर कादीर शेख (४१, रा. मुंब्रा- ठाणे, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे बोगस डॉक्टरचे नाव असून, तो भुसावळातील सुरभी कॉम्प्लेक्स येथे दवाखाना चालवून बनावट व चुकीची औषधी देत असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार या दवाखान्यावर मंगळवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास पथकाने छापा मारला.
या ठिकाणी शमशीर शेख हा बोगस डॉक्टर बेकायदेशीररीत्या वैद्यकीय व्यवसाय करताना आढळला. त्याच्याविरुद्ध आरोग्य अधिकारी बाळासाहेब वाबळे यांच्या फिर्यादीवरून भादंवि कायदा कलम ३२८ ४२०, ४१९, ३४ सह महाराष्ट्र प्रॅक्टिशनर्स अॅक्ट १९६१ कलम ३३, ३३ (अ), दि ड्रग्ज अॅण्ड मॅजिक रेमिडिज, ऑब्जेक्शन नेबल अॅडव्हरटाइज मेट्स अॅक्ट १९५४ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाच्या छाप्यामध्ये अवैधरीत्या विनापरवाना २३ हजार ८६८ रुपयांची औषधीही मिळून आल्या. ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकासह आरोग्य अधिकारी बाळसाहेब वाबळे, कनिष्ठ सहायक पंकज पाचपोळ, डॉ. अनिल माणिकराव आदींच्या पथकाने केली.