चाळीसगाव प्रतिनिधी : शहरात सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर चाळीसगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई करत १६ जणांना ताब्यात घेतले असून तब्बल २ लाख ८२ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे..
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धुळे-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल प्रांजलच्या बाजूला असलेल्या एका खोलीत सोशल क्लबच्या नावाखाली जुगार सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार व उपविभागीय पोलीस अधिकारीविजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
छाप्यात जुगार खेळताना प्रविण विलास गोत्रे (चाळीसगाव), संजय रतन गायकवाड (मॅनेजर, वडगाव लांबे), भुराजी गौराजी दहीहंडे (धुळे), रशीद कादर पठाण (बीड), शाबिरखान फयाजखान (चाळीसगाव), कैलास नामदेव भावड (मनमाड), विठ्ठल खंडेराव वाघ (चाळीसगाव), गोपालदास नारायणदास रत्नानी (छत्रपती संभाजीनगर), कलीमशहा सलीम शेख (चाळीसगाव), अशपाक परमजीत पंजावी (चाळीसगाव), अकलाद शेख इस्माईल शेख (चाळीसगाव), प्रविण संतोष पाटील (चाळीसगाव), सागर राजेंदू चौधरी (जळगाव), अमोल गणपत गवळी (चाळीसगाव), फिरोज चॉदखा पठाण (चाळीसगाव) व सुरेश निंबा मानकर (सटाणा, नाशिक) यांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान रोख रक्कम, जुगारासाठी वापरण्यात येणारे नाणे (कॉईन) तसेच मारुती सुझुकी कंपनीची बलेनो कार असा एकूण २,८२,९७० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विलास पवार यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.















