जळगाव (प्रतिनिधी) प्रतिबंधीत असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर शहर पोलिसांनी शनिवारी दुपारच्या सुमारास छापा टाकला. याठिकाणाहून इरफान शाह आजम शाह (वय ३३, रा. सिटी कॉलनी) याला अटक केली असून त्याच्याकडून ७ हजार रुपये किंमतीचे ७ नायलॉन मांजाचे रिळ व मांजा गुंडाळण्याचे मशिन जप्त केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा केला जातो. त्या करीता अनेक जण प्रतिबंधीत असलेला नायलॉन मांजाचा वापर करतात. या मांजामुळे अनेकदा अपघात होवून जखमी झाले आहे तर अनेकांचा जीव देखील गमवावा लागला आहे. शहरातील सीटी कॉलनीत नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली. त्यानुसार सपोनि सुरेश आव्हाड, सफौ सुनिल पाटील, दीपक शिरसाठ, उमेश भांडारकर, सतिष पाटील, अमोल ठाकूर, महिला पोहेकॉ धनश्री दुसाने यांचे पथक रवाना केले. या पथकाने इरफान खान याच्या घरावर छापा टाकला. याठिकाणाहून ७ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजाचे ७ रिळ जप्त केले. याप्रकरणी संशयित इरफान शाह आजम शाह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















