नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दैनिक भास्कर समूहावर आयकर विभागाच्या छापेमारीचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उमटले आहेत. या धाडींच्या विरोधात राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. अगदी लोकसभेत सुद्धा याचे पडसाद बघायला मिळाले. विरोधकांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
दैनिक भास्कर’च्या भोपाळसह देशभरातील अनेक कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने छापा टाकला आहे. दरम्यान, कोरोना काळातील भयावह स्थिती जगासमोर मांडल्याने आणि पेगासस प्रकरणाचे रिपोर्टिंग केल्याने दैनिक भास्कर समुहाला टार्गेट केले जात असून माध्यमांची मुस्कटदाबी सुरु असल्याचा आरोप होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारकडून झालेल्या गैरव्यवस्थापनाची सत्य परिस्थिती दैनिक भास्कर समूहाने समोर आणण्याचा प्रयत्न केला होता. दैनिक भास्कर समूहाच्या अनेक कार्यलयांवर गुरुवारी पहाटेपासूनच आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. यात दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातसह राजस्थानच्या कार्यलयांमध्ये आयकर विभागाचे अधिकारी छापेमारी करत आहेत. दरम्यान, भास्करच्या निर्भीड पत्रकारितेचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कौतुक करत मोदी सरकारचा निषेध केला आहे.