जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जुने बसस्थानकाच्या पाठीमागे मनिष कॉम्लेक्सच्या तिसर्या मजल्यावर सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे धाड टाकली. त्यात धरणगाव येथील माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह ९ जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
यासंदर्भात अधिक असे की, जुने बसस्थानकाच्या पाठीमागे मनीष कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर ज्ञानेश्वर महाजन यांनी योगेश्वर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, धरणगाव या नावाने जुगार अड्डा सुरू केला होता. याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी त्यांच्या कार्यालयातील अशोक फुसे यांच्यासह सहकाऱ्यांना घेऊन पहाटे दीड वाजता या जुगार अड्डयावर धाड टाकली. त्यात रोख रक्कम व वाहने मिळून ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती.
दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे रुस्तम तडवी यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर भादू महाजन (वय ५३,रा.मोठा माळीवाडा, धरणगाव), भूषण रामा माळी (वय २४, रा.धरणगाव), दिनेश दिलीप धोबी (वय २४, रा.मेहरुण), मनोज जयराज जयंतीलाल (वय ६०, रा.नवी पेठ), रोहित संजय पवार (वय २६, रा. गणेश कॉलनी), ज्ञानेश्वर बुधा चौधरी (वय ५६, रा.धरणगाव), गणेश आत्माराम महाजन (वय ३२, रा. धरणगाव), गुलाब लखीचंद सपकाळे (वय ३०. रा. सावखेडा, ता.जळगाव) व लोकेश विनोद झंवर (वय ३२, रा.भोकर, ता.जळगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ज्ञानेश्वर महाजन यांची चारचाकी जप्त करण्यात आली आहे.