पुणे (वृत्तसंस्था) पुणे शहरातील आमदार अनिल भोसले यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकला. त्यांच्या दोन महागड्या गाड्या आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही छापेमारी करण्यात आली. या गुन्ह्यात त्यांना अटकही करण्यात आली होती. पोलीस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांनी जामिनासाठी दोन वेळा अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला.
अनिल भोसले संचालक होते, त्यावेळी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत गैरव्यवहार होण्यास सुरुवात झाली होती. बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादले होते. ठेवीदारांना बँकेतून केवळ एक हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती. भोसले यांनी बँकेतून दोन कोटी रुपये काढले. दोन कोटी रुपयांचा व्यवहार झाला, त्याचा कोणताही हिशेब नाही. बँक खाते नसताना ८० कोटी रुपयांचा धनादेश त्या खात्याच्या नावावर काढण्यात आला, त्या ८० कोटी रुपयांचा हिशेब नाही. भोसले यांनी २०१९ मध्ये जनजागृती संघटनेला प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यात त्यांनी १ लाख ठेवीदारांचे ४३० कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते. मात्र, त्यातील एकही रुपया ठेवीदारांना दिला नाही. भोसले हे सामाजिक, राजकीयदृष्ट्या भक्कम असल्यामुळे साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज यापूर्वी फेटाळण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून कारवाईला सुरुवात झाली आहे. भोसले यांच्या घरावर छापेमारी करून त्यांच्या महागड्या कार आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. कारची किंमत कोट्यवधी रुपये आहे. त्यांच्याकडील आणखी वाहने जप्त केली जाण्याची शक्यता आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यापूर्वी भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.