सिडनी (वृत्तसंस्था) ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. पावसामुळे सिडनी कसोटीच्या पहिल्या सत्राचा खेळ बाधित झाला आहे. पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने ७.१ षटकात एक बाद २१ धावा केल्या होत्या. विल पुकोवस्की (नाबाद १४ धावा), मार्नस लाबुशेन (नाबाद २ धावा) खेळत होते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीमध्ये सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात प्रत्येकी दोन बदल करण्यात आले आहेत. दोन्हीही संघ मालिकेत १-१ अशा बरोबरीत आहेत. दरम्यान, नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. दुखापतीमधून सावरुन कमबॅक करणारा डेव्हिड वॉर्नर अवघ्या पाच धावा करुन माघारी परतला आहे. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर वॉर्नरने स्लिपमध्ये असलेल्या चेतेश्वर पुजाराकडे झेल दिला. भारतीय संघात धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माचं पुनरागमन झालं आहे, तर नवदीप सैनीला पदार्पणाची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियन संघात डेव्हिड वॉर्नरने कमबॅक केलं आहे. तर विल पुकोवस्कीला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. त्याने वॉर्नरसोबत डावाची सुरुवात केली.
बॉर्डर-गावस्कर मालिकेतील अॅडलेडमधल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला होता. पण मेलबर्न कसोटीत अंजिक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत मालिकेत कमबॅक केलं आणि ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सनी मात केली. जर भारतीय संघाने सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडे ठेवण्यात भारताला यश येईल. याआधी भारताने २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाला चार सामन्यांच्या मालिकेत २-१ असं नमवलं होतं.