पुणे (प्रतिनिधी) बंगालच्या उपसागरात नव्याने निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे पुण्यासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पाऊस कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुण्यात पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटांसह पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात गेली आठवडाभर पावसाने चांगली हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा आंध्रप्रदेश ते महाराष्ट्र आणि तेथून अरबी समुद्रातील प्रवास यामुळे या तिन्ही राज्यांमध्ये जोरदार पाऊस अनुभवायला मिळाला. हा कमी दाबाचा पट्टा आता ओमानकडे सरकत असल्याने त्याची तीव्रता कमी झाली आहे.
मात्र, बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांमध्ये निर्माण होत असून पुढील 24 तासांत तीव्रता वाढणार आहे, त्याच्या प्रभावामुळे पुण्यासह महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्यात 22 ऑक्टोबरपर्यंत मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पावसाची शक्यता विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, शहरात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. सायंकाळी तुरळक स्वरूपात पावसाने हजेरी लावली. हवामान विभागातर्फे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर वेधशाळेत तीन मिलीमीटर तर लोहगाव येथे 16 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली.