मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई क्राईम ब्रँचनं अश्लील चित्रपटांशी संबंधित प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म प्रकरणी सोमवारी रात्री अटक झाली. फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याचं मुंबई पोलिसांच्या लक्षात आलं होतं. त्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली. आज राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी रियान थार्प या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री तर थार्पला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड राज कुंद्रा
मुंबई गुन्हे शाखेने म्हटल्याप्रमाणे राज कुंद्रा हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड आहे. ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या राज कुंद्रा आणि त्याचा भाऊ यांनी केनरिन नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीने सुरू केलेल्या अॅपमार्फत अश्लील सिनेमे दाखवले जातात. सिनेमांचे व्हिडिओ भारतात चित्रीत करण्यात येतात आणि व्ही ट्रान्सफरच्या माध्यमातून परदेशात पाठवण्यात येतात.