भुसावळ (प्रतिनिधी) फेरफार नाव लावण्यासाठी तडजोडीअंती सहा हजारांची लाच स्वीकारताना मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा ग्रामसेवक मनोज सुर्यकांत घोडके (34) व शिपाई सचिन अशोक भोलाणकर (23) यांना बुधवारी सायंकाळी जळगाव एसीबीने अटक केली.
आधी शिपाई नंतर ग्रामसेवक जाळ्यात
राजुरा गावातील 42 वर्षीय तक्रारदार यांच्या आईच्या नावाचे घर व प्लॉट असून त्यांना घर व प्लॉटवर आईचे नाव कमी करून तक्रारदार यांचे फेरफार नाव लावण्यासाठी तक्रारदाराने राजुरा ग्रामपंचायतीत अर्ज केला. तक्रारदार यांचे फेरफारवर नाव लावण्यासाठी ग्रामसेवकाने 11 हजारांची लाच 15 मे रोजी मागितली होती व त्याबाबत जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. बुधवारी लाच पडताळणीत 11 हजारांची लाच मागणी केल्यानंतर ग्रामसेवकाने तडजोड करीत सहा हजारांची लाच शिपायाकडे देण्याचे सांगितले. शिपायाने लाच स्वीकारताच ग्रामसेवकालाही अटक करण्यात आली. संशयीतांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, हवालदार सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे आदींच्या पथकाने यशस्वी केला.