लखनौ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. ही पीडित मुलगी जेव्हा पोलिसांत तक्रार दाखल करायला गेली तेव्हा पोलिसांनीच तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणातील आरोपी एसएचओ फरार असून त्याच्यावर कारवाईची फेरी सुरू झाली आहे.
पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, पाली शहरातील रहिवासी चंदन, राजभान, हरिशंकर आणि महेंद्र चौरसिया यांनी तिच्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला भोपाळला नेले. येथे त्यांनी तीन दिवस सतत तिच्यावर बलात्कार केला, त्यादरम्यान ते तिला स्टेशनजवळील रस्त्यात लपवून ठेवत होते. यानंतर 25 एप्रिल रोजी या चौघांनी तिच्या मुलीला पाली पोलीस ठाण्यातील निरीक्षकाजवळ सोडून पळ काढला. यामध्ये, पोलीस कर्मचाऱ्याने मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सोपवण्याऐवजी मुलीला तिच्या मावशीच्या ताब्यात दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर, दोन दिवसांनंतर 27 एप्रिल रोजी मुलीला पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावून तिची जबाब घेण्यात आला. त्याच दिवशी सायंकाळी पोलीस ठाण्यात टिळकधारी सरोज याने मुलीला खोलीत नेले आणि येथे तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलीला पुन्हा मावशीच्या ताब्यात दिले.
पीडितेच्या आईने सांगितले की, एवढेच नाही तर तीन दिवसांनंतर 30 एप्रिलला पुन्हा मुलीला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आणि येथे मुलीला चाइल्डलाइनच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर चाइल्ड लाईनमध्ये पिडीतेचे समुपदेशन केले असता, हा सगळा भयानक प्रकार मुलीने सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी एसएचओ पाली तिलकधारी सिंग सरोज, चंदन, राजभान, हरिशंकर, महेंद्र चौरसिया आणि एका महिलेविरुद्ध पोक्सो कायदा आणि एससी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
















