मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध कवी आणि रिपाईचे राज्यसभा खासदार आणि अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज गो कोरोना गो स्लोगनवरून मोठा दावा केला आहे. तसेच नवीन स्लोगनची देखील घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेन संदर्भात रामदास आठवलेंनी ‘नो कोरोना’, ‘नो कोरोना’ अशी घोषणा केली आहे.
आठवले यांनी मार्चमध्ये कोरोनो गो… गो कोरोना… गो… असे म्हणत कोरोनाला पळवून लावण्यासाठी विदेशी नागरिकांसोबत व्हिडीओ पोस्ट केला होता. आठवले यांचा हा विदेशी नागरिकांसमवेतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये, चायना-इंडिया साँग असे म्हणत, रामदास आठवले कोरोनो गो… गो कोरोना… गो… असे म्हटले होते. तर, आठवलेंसमवेत असलेला विदेशी नागरिकही गो कोरोना… कोरोना गो… असे म्हणत होता. विशेष म्हणजे भारतीय ध्वजाचं चिन्ह असलेला एक फलकही या नागरिकांसोबत दिसत होता. समोर मेणबत्ती पेटवलेल्या दिसत होत्या. रामदास आठवलेंच्या या व्हिडीओवरुन अनेकांनी त्यांना ट्रोल केले होते. तसेच, केंद्रीयमंत्र्यांना हे शोभतं का, असा सवालही नेटीझन्सने केला होता. आता या व्हिडीओनंतर आठवले यांनी मोठा दावा केला आहे. याआधी मी ‘Go Corona, Corona Go’ चा नारा दिला होता, आता कोरोना जात आहे. आता नव्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनसाठी मी नवीन स्लोगन ‘No Corona, Corona No’ देत आहे, असे आठवलेंनी म्हटले आहे.