मुंबई (वृत्तसंस्था) राज्यभरातून शिवसैनिक मातोश्रीबाहेर दाखल झाले आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांची फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, एकंदरीत या गोंधळानंतर राणा दाम्पत्याने आज माघार घेतली असून मातोश्रीवर उद्या जाणार असल्याचे म्हटल्याचे समजते.
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केल्यापासून शिवसैनिकांनीही जोरदार तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. आता सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन राणा दाम्पत्याने स्पष्ट केले होते. त्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले असून आज सकाळपासूनच राणा कुटुंबीयांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. येथे शिवसैनिक आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजीही सुरू आहे. त्यानंतर, राणा दाम्पत्याने आज माघार घेतल्याचं समजत आहे.
शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले असून राणा दाम्पत्याच्या घराबाहेरही शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मातोश्रीबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. त्यातच आता हिंमत असेल तर येऊन दाखवा, शिवसैनिक सज्ज आहेत, असे बॅनर मातोश्रीसमोर झळकले असून, शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. पोलिसांनी राणा दाम्पत्यास घराबाहेर पडू दिलं नाही. तर, त्यांच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले असून आम्ही शनिवारचा महाप्रसाद देणारच, असेही ते म्हणत आहे. एकंदरीत या गोंधळानंतर राणा दाम्पत्याने आज माघार घेतली असून मातोश्रीवर उद्या जाणार असल्याचे म्हटल्याचे समजते.