उल्हासनगर (वृत्तसंस्था) अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंग गडावर सोमवारी सकाळी दरड कोसळली. या दुर्घटनेत मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन जखमींवर उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुलाम सय्यद (३५) असे मृताचे नाव आहे.
श्रीमलंग गडावर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. मात्र डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या या कुटुंबांना पावसाळ्यात धोका निर्माण होतो. धोका असूनही येथे वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. सोमवारी सकाळी एका घरावर दरड कोसळली. दरड कोसळताना मुलाचा जीव वाचवायला गेलेल्या वडिलांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. गुलाम सय्यद असे मृताचे नाव आहे. तर त्यांचा दीड वर्षाचा मुलगा आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. मुलाचा जीव वाचवायला गेले असताना मुलाचा जीव वाचला, मात्र वडील गुलाम सय्यद यांना जीव गमवावा लागला. तर त्याची पत्नी नाभिया आणि मुलगा गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.