मुंबई (वृत्तसंस्था) हद्द झाली राव, मोदीजी आणखी किती फेकणार, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. मोदींनी आपण बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला होता, असं मोदी यांनी म्हटलं होतं. मोदींच्या या विधानाची पटोले यांनी खिल्ली उडवली आहे.
मोदी यांच्या या भाषणाचं ‘राजकीय’ विश्लेषण सध्या भारतात सुरू आहे. विरोधकांनी मोदींच्या या दाव्याची खिल्ली उडवली आहे. खरंच, मोदी हे बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते का, यावरून चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ट्वीटच्या माध्यमातून मोदींना टोला हाणला आहे. ‘मोदीजी, आणखी किती फेकणार? आमच्या मराठीत एक म्हण आहे, हद्द झाली राव!,’ असं पटोले यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल एक शब्दही आपल्या तोंडातून निघाला नाही आणि स्वातंत्र्याच्या बाता मारण्यासाठी बांगलादेशात जाता? शेतकऱ्यांना आपण ‘आंदोलनजीवी’ म्हणाला होतात. मग आपण कोण आहात, ‘ढोंगजीवी’?,’ असा चिमटाही पटोले यांनी काढला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर असून ढाका इथं शुक्रवारी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून देशात राजकीय टीका-टिप्पणीला जोर चढला आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रामाविषयी पंतप्रधान मोदी यांनी केलेलं वक्तव्य यासाठी कारणीभूत ठरलं आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं होतं. हे आंदोलन माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनांपैकी होतं. तेव्हा मी २०-२२ वर्षांचा असेन. पाकिस्तानी सैन्यानं बांगलादेशी नागरिकांवर केलेल्या अत्याचाराची छायाचित्रं पाहून अनेक दिवस आम्हाला झोपही लागली नव्हती. बांगलादेशच्या स्वातंत्र्याबद्दल जी भावना बांगलादेशात होती, तितकीच ती भारतात होती,’ असं मोदी यांनी काल आपल्या भाषणात नमूद केलं होतं.