मुंबई (वृत्तसंस्था) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला. यावेळी फडणवीसांनी वक्फ बोर्डाच्या एका सदस्याने एका महिला सामाजिक कार्यकर्तीवर बलात्कार केल्याचा आरोप करत विधानसभा दणाणून सोडली. तसेच हा आरोपी अद्याप मोकाट असून या वक्फ बोर्डातील सदस्यांचा बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीमबरोबर संबंध असूनही तो अजूनही वक्फ बोर्डात कसा असा सवाल करत ठाकरे सरकारला कोंडीत पकडले. यावेळी फडणवीस यांनी पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिला.
वक्फ बोर्डाच्या एका सदस्याने सामाजिक कार्यकर्त्या महिलेवर बलात्कार केला आहे. या महिलेने तशी तक्रार दिली आहे. तरीही हा सदस्य मोकाट आहे. शिवाय या वक्फ बोर्डातील सदस्यांचा बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमशी संबंध आहे. तरीही हा माणूस वक्फ बोर्डात कसा? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच या वक्फ बोर्डाच्या सदस्याच्या संवादाचा व्हिडीओच एका पेनड्राईव्हमधून त्यांनी विधानसभा अध्यक्षांना दिला. या प्रकरणातील एक जण तुरुंगात आहे. त्याच्या मोबाईलमध्ये सर्व संभाषण आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घ्या आणि कारवाई करा, असं आवाहन फडणवीस यांनी केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत पुन्हा एकदा धमका केला. त्यांनी एक वक्फ बोर्डाच्या एका सदस्याचं व्हिडीओ संभाषण असलेला पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिला. त्यानंतर या व्हिडीओत नेमकं काय संभाषण आहे आणि ही माणसं कोण आहेत याची माहिती दिली. या पेन ड्राईव्हमध्ये दोन पात्रं आहेत. मोहम्मद अर्शद खान आणि डॉ. मुदीस्सर लांबे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमलं ते मुदस्सीर लांबे हेच आहेत. 31 डिसेंबर 2020 ला त्यांच्या विरोधात एका 33 वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला तेव्हा लांबेने लग्न करण्याची तयारी दाखवली आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी या महिलेला दिली, असं फडणवीसांनी सांगितलं.
28 जाने 2020 रोजी ही घटना घडली. लग्नाच्या आश्वासनामुळे ऑक्टोबर 2020पर्यंत ही महिला पोलीस तक्रारीची वाट राहिली. हा प्रकार समजल्यानंतर या महिलेच्या पतीने तिला घटस्फोट दिला. त्यामुळे या महिलेने लांबेला आत्महत्येचा इशाराही दिला. या महिलेच्या पतीविरोधात लांबेंनी चोरीची तक्रार दिली. त्यानंतर या महिलेचा पती तुरुंगात गेला आहे. 28 जानेवारी 2022 रोजी शीळ डायघर पोलीस ठाण्यात या महिलेच्या पतीविरोधात तक्रार दिली होती. त्यामुळे या महिलेचा पती तुरुंगात आहे आणि लांबे बाहेर आहे, असं फडणवीस म्हणाले.
चक्क दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर घेतली
अर्शद खान अटकेत आहे. त्याचा मोबाईल जप्त करा. त्यात या दोघांचेही संवाद असून दाऊदबाबतच्या त्यांच्या संबंधाचा त्यात खुलासा आहे. हे संभाषण डिलीट करण्याआधी मोबाईल ताब्यात घ्या, असं सांगतानाच चक्क दाऊदची माणसं तुम्ही वक्फ बोर्डावर नियुक्त केली. अर्थसंकल्पात काही गोष्टी कमी जास्त होतील. पण बॉम्ब स्फोटात असलेल्यांना वक्फ बोर्डावर घेणं कितपत योग्य आहे, असा सवाल फडणवीसांनी केला.