अमळनेर (प्रतिनिधी) एका महिला सफाई कामगाराचा विनयभंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आरोग्य निरीक्षक व मुकादमासह तिघांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पीडित सफाई कामगार महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून आरोग्य निरीक्षक युवराज श्रीपत चव्हाण, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे आणि मुकादम ज्ञानेश्वर मंगल संदानशिव हे कामावर त्रास देत होते. २७ जून रोजी सकाळी ९ वाजता त्यांनी विनयभंग करून लोटून दिल्याने त्या खाली पडल्या होत्या. त्यांनतर ही तिघांनी त्रास देणे सुरूच ठेवले.
तसेच या तिघांनी १३ जुलै रोजी शिस्तभंगाची नोटीस दिली. याबाबत मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. तर उशिराने गावाहून आल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात पीडित महिला कामगाराने फिर्याद दिल्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करत आहेत.