नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २४ जुलै रोजी गोव्याच्या बेनालिम समुद्रकिनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला. या घटनेनंतर गोव्याच्या विधानसभेत विरोधकांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देतानाच मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ‘तरुण मुलांच्या आई-वडिलांनी आपली मुलं रात्री कुठे जात आहेत याकडे लक्ष द्यायला हवं’, असं वक्तव्य केलंय. या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संबंधित घटनेबद्दल विधानसभेत माहिती दिली. या घटनेत १० तरुण समुद्रकिनारी पार्टीसाठी गेले होते. यातील सहा जण घरी परतले मात्र चौघे जण तिथंच थांबले होते. यात दोन मुले आणि दोन मुली होत्या. अल्पवयीन मुलांचं अशा पद्धतीनं रात्रभर घराबाहेर राहणं योग्य नाही, असंही प्रमोद सावंत यांनी म्हटलं. एका १४ वर्षांची मुलगी संपूर्ण रात्रभर समुद्रकिनारी भटकत असेल तर आई-वडिलांना आत्मनिरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. केवळ मुलं ऐकत नाहीत म्हणून आपण केवळ सरकार आणि पोलिसांवर ही जबाबदारी टाकू शकत नाहीत, असं वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भर विधानसभेत केलं.
दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार
संबंधि घटना २४ जुलै रोजी घडली. गोव्याच्या बेनालिम समुद्रकिनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आला तर त्यांच्यासोबत असलेल्या दोन मुलांना जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केलीय. यातील एक आरोपी सरकारी कर्मचारी आहे. आसिफ हटेली (२१ वर्ष), राजेश माने (३३ वर्ष), गजानन चिंचकर (३१ वर्ष) आण नितीन यब्बल (१९ वर्ष) अशी या आरोपींची नाव आहेत.