जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोविड-१९ बाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे व जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणारे बेड्स, इतर वैद्यकीय सुविधा कोविड-१९ बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अपुऱ्या पडत असल्याने जळगाव जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांना कोविड-१९ बाधित रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
खाजगी कोविड रुग्णालयांना शासनाकडून कोविड-१९ बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी निश्चित करुन देण्यात आलेले शुल्क/दर लागू आहेत. तथापि, बायो-मेडिकल वेस्टच्या दराबाबत शासनस्तरावरुन कोणत्याही सुचना, दर निश्चित करुन देण्यात आलेली नाहीत. सद्य:स्थितीत जळगाव जिल्ह्यातील काही खाजगी कोविड रुग्णालयांकडून बायो-मेडीकल वेस्ट च्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने खाजगी कोविड रुग्णालयांसाठी बायो-मेडीकल वेस्टचे दर निश्चित करुन देणे क्रमप्राप्त आहे.
या पार्श्वभुमीवर जळगाव जिल्ह्यातील खाजगी कोविड तसेच नॉन कोविड रुग्णालयांकरिता बायो-मेडीकल वेस्ट डिस्पोजल करिता सर्व खाजगी कोविड व नॉन कोविड रुग्णालये यांच्यासाठी रुपये २५०/- प्रति दिन, प्रति रुग्ण असे आहेत.
नमूद केलेल्या दरानुसारच जळगाव जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयांनी बायो-मेडीकल वेस्टबाबत शुल्क आकारणी करावी. तथापि, याबाबत असे देखील स्पष्ट करण्यात येते की, ज्या रुग्णालयांकडून कोविड-१९ बाधित रुग्णांवर उपचारासाठी शासनाने निश्चित करुन दिलेल्या दरापेक्षा अधिक/जादा बिल आकारणी करतील. ते रुग्णालये बायो-मेडीकल वेस्टच्या शुल्काकरिता जास्तीत जास्त २५०/- रुपये प्रति दिन इतक्या रकमेच्या वसुलीस पात्र राहतील. असे अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.