रत्नागिरी (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे अद्यापही राणे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
दरम्यान, सकाळी नाशिकमध्ये भाजपाच्या जिल्हा कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करुन तोडफोड केली. त्यानंतरही अनेक ठिकाणी अशाप्रकारची आंदोलन होत असल्याचं दिसत आहे. मात्र असं असतानाच आता विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कार्यालयांवर हल्ले करणाऱ्या शिवसैनिकांना तसेच त्यांच्याविरोधात कारवाई करण्यामध्ये दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना इशारा दिलाय.
नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. कालच्या राणे यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक, पुणे आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं रवाना झाली होती. दोन पोलीस निरीक्षकांसह एकूण पंधरा कर्मचाऱ्यांचा या पथकांमधे समावेश आहे. पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमधे नारायण राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलीस तातडीने चिपळूणला रवाना. नाशिकमधेही राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलीसही राणेंना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झालेत.