मुंबई (वृत्तसंस्था) २०१९ वर्षाची लोकसभा निवडणूक कॉंग्रेसच्या उमेदवारीवर लढवणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या आज सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार होत्या. शिवसेनेच्या वतीने त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या सदस्यपदासाठी पाठवल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. मात्र, मातोंडकर अथवा शिवसेना पक्षाकरून याबाबतचा कोणताही अधिकृत तपशील आतापर्यंत जाहीर केला गेला नाही. आता मात्र याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलतांना ऊर्मिला मातोंडकर यांच्या सेनेत प्रवेशाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले,’ऊर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच आहे. कदाचित मंगळवारी त्या पक्षात प्रवेश करतील. ही शिवसेनेसाठी चांगलीच गोष्ट आहे. त्यांच्या प्रवेशामुळे महिला आघाडी मजबूत होईल’. दरम्यान, कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एक वर्षाने मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या आधी मार्च 2019 मध्ये मातोंडकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर पाचच महिन्यात सप्टेंबर 2019मध्ये त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.