जळगाव (प्रतिनिधी) महाविकास आघाडीच्या दोघं उमेदवारांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेत शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात एक शिवी दिली. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. शिवीगाळ आणि पालकमंत्र्यांवरील टीका जिव्हारी लागल्यामुळे शिंदे सेना मैदानात उतरल्याचे चित्र महायुतीच्या कालच्या रॅलीतून दिसून आले.
राऊतांच्या भाषणात पाच वेळा शिवराळ शब्दांचा प्रयोग !
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आलेले खासदार संजय राऊत आले होते. यावेळी झालेल्या सभेत राऊत आपल्या भाषणात म्हणाले होते की, भाजप म्हणजे XXXX पक्ष आहे. जळगाव आणि रावेरातील अशा XXXX ना गाडण्याची जबाबदारी जनतेवर आहे. महाराष्ट्रावर या XXXX नी जो अन्याय अत्याचार केला. त्याचा बदला घेण्याची वेळ आपल्यावर आली आहे. अडीचशे खोके घेऊन बसलेले सभेकडे पहाताहेत. सर्वात मोठी गद्दारी जळगाव जिल्ह्यात झाली. या पान टपरी वाल्याला ४ जूननंतर त्याला परत टपरीवर बसवण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे या दोन्ही मराठी माणसांचे पक्ष त्या XXXX का फोडले?, असा असंसदीय शब्द राऊत यांनी आपल्या भाषणात वापरला होता.
राऊतांनी आम्हाला कामाला लावले : गुलाबराव पाटील !
गुरुवारी महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता वाघ तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे अर्ज दाखल केल्यानंतर एक सभा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आपापली भाषणं केली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमी शैलीत संजय राऊत यांचा जोरदार समाचार घेतला. गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत ज्या प्रकारे अर्वाच्य भाषेत बोलले, त्यापेक्षा जास्त आम्ही बोलू शकतो. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आमच्यावर आहेत. त्यामुळे आम्ही त्या शब्दात बोलणार नाहीत. आतापर्यंत या निवडणुकीत आम्ही शांत होतो. कोण एवढ्या उन्हात बाहेर निघेल, असे म्हणत होतो; पण संजय राऊतांनी आम्हाला कामाला लावले. त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. आता आम्ही पूर्ण क्षमतेने काम करतोय. एवढेच नव्हे तर, संजय राऊत हे आमच्या मतांवर खासदार झाले. संजय राऊतांमध्ये जर हिंमत असेल, तर त्यांनी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून उभे राहून दाखवावे, असे आव्हान देखील गुलाबराव पाटील यांनी राऊतांना दिले.
अन् शिंदे सेना उतरली मैदानात !
लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी जाहीर झाल्यापासून रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघात भाजप आपल्या परीने प्रचाराला लागली होती. परंतू शिंदे गट पाहिजे तसा सक्रीय झालेला नव्हता. विधानसभेतील कटू अनुभवामुळे शिंदे सेना काम करत होती, परंतू निवडणूक अंगात आणत नव्हती. परंतू खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात एक शिवी दिली आणि शिंदे सेना पेटून उठत झपाटून कामाला लागली. राऊतांची शिवी आणि जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांवर केलेली टीका शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यातूनच कुठं तरी शांत असलेल्या शिंदे सेना मैदानात उतरली. त्यामुळे गुरुवारच्या रॅलीत पाचोरा, भडगाव, अमळनेर, धरणगाव, जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीणमधून भाजपसोबत शिंदे सेनेचे शिवसैनिकही मोठ्या प्रमाणात दिसून आलेत.
ठाकरे गटाकडून विधानसभेपूर्वीच आक्रमक प्रचाराची रणनीती ?
खासदार संजय राऊत यांनी बुधवारी आपल्या भाषणात शिवराळ भाषा वापरली होती. परंतू शिवसेनेकडून अशाच पद्धतीची आक्रमक प्रचाराची रणनीती आखली गेल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या आमदारांना विधानसभेपूर्वीच आतापासून जेरीस आणायचे, हा देखील ठाकरे गटाच्या रणनीतीचा भाग असू शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणूक देखील गद्दारी-खुद्दारी मुद्द्याच्या अवती-भवती फिरावी, जेणे करून भाजपला मोदींच्या नावावर मते मागण्यापासून रोखता येईल आणि राज्यातील भावनिक मुद्द्यांवर प्रचारात भर देता येईल. दुसरीकडे भाजपने देखील शिवराळ भाषा आणि महिलांचा अपमान याच मुद्द्यावरून शिवसेनेला अडचणीत आणण्याची रणनीती आखल्याचे दिसून येत आहे.