नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आधीच महागाईच्या भडक्यात होपळून निघालेल्या सर्वसामान्यांना पुन्हा एक झटका बसला आहे. देशात घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत (LPG Cylinder Price hike) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यानंतर देशात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (Domestic LPG Cylinder is above 1000 rupees) किंमतीचा आकडा 1000 च्या पुढे गेला आहे.
आज घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 3 रुपये 50 पैसे इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे भारतात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव 1000 रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. या दरवाढीमुळे आजपासून 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत दिल्ली आणि मुंबईत 1003 रुपये, कोलकात्यात 1029 रुपये, चेन्नईत 1018.5 रुपये इतका झाला आहे. या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. यापूर्वी 7 मे रोजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली आहे.
देशातील प्रमुख शहरांतील घरगुती LPG Cylinder ची किंमत (14.2 किलो)
दिल्ली – 1003 रुपये प्रति सिलेंडर
मुंबई – 1002.50 रुपये प्रति सिलेंडर
कोलकाता – 1029 रुपये प्रति सिलेंडर
चेन्नई – 1018.50 रुपये प्रति सिलेंडर
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरही महागला
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरासोबतच व्यवावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही 8 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून 19 किलो गॅस सिलेंडरचा दर दिल्लीत 2354 रुपये, कोलकात्यात 2454 रुपये, मुंबईत 2306 रुपये आणि चेन्नईत 2507 रुपये इतके मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 7 मे रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 10 रुपयांनी कपात करण्यात आली होती. तर 1 मे रोजी यामध्ये तब्बल 100 रुपयांची वाढ झाली होती. त्याचवेळी मार्च महिन्यात दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 2012 रुपये इतकी होती. 1 एप्रिलला 2253 रुपये इतका दर होता तर 1 मे रोजी हा दर 2355 रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 750 रुपयांनी वाढ झाली आहे.