नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात मास्क घालण्यास नकार दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आम आदमी पक्षाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.
”मास्क घाला, मोदींजींसारखे वागू नका’, अशी कॅप्शन या व्हिडीओसोबत लिहण्यात आली आहे. कोरोना संकट अद्यापही टळलं नसून आरोग्य मंत्रालय वारंवार सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील अनेक कार्यक्रमांमधून देशवासीयांना वारंवार आवाहन करत असतात. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क घेण्यास नकार देताना दिसत आहेत. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर आणखीनच व्हायरल झाला. अनेकजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीवर टीका करत आहेत. एरवी पंतप्रधान मोदी सतत आपल्या भाषणांमधून नागरिकांना ‘दो गज की दुरी’ पाळण्याचे आणि मास्क परिधान करण्याचे आवाहन करत असतात. मात्र, आता मोदींनीच सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचा नियम बाजूला सारल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तकला मेळाव्याला भेट दिली होती. यावेळी मोदी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या गोष्टी पाहत होते. याठिकाणी फिरताना मोदींच्या तोंडावर मास्क नव्हता. तेव्हा एका स्टॉलवरील माणसाने पंतप्रधान मोदी यांना मास्क देऊ केला. समोरील व्यक्ती गुजराती भाषेत बोलताना ऐकू येत आहे. वारंवार आग्रह करुनही मोदी मात्र मास्क घेण्यास नकार देताना व्हिडीओत दिसत आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी तसेच पुढेही निघून गेले. विशेष म्हणजे या व्हिडीओत नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेले अधिकारी आणि सुरक्षारक्षकांनी मास्क परिधान केले आहेत. मात्र, हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबत ‘आप’कडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
















