भुसावळ (प्रतिनिधी) नैसर्गिक पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाल्याने होणारी हानी बाबत भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉ. नितु पाटील यांनी वरणगाव मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. येत्या ७ दिवसात पाणी निचरा होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा २८ ऑक्टोबर २०२४, सोमवार पासून वरणगाव नगर परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसेल, असे डॉ. नितु पाटील म्हणाले.
डॉ. नितु पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, वरणगाव आणि फुलगाव शिवाराला लागून राष्ट्रीय महामार्गाजवळ वरणगावमध्ये येणारा सर्विस रोड लगत असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये (गट क्र.८००,८०२) पावसाचे पाणी भरपूर प्रमाणात साचत आहे. ते पाणी सर्व गट.क्र.८०४ द्वारे पुढे जात आहे. पण पुढे महालक्ष्मी नगरकडे जाणारा रस्ता असल्याने पाणी गट.क्र.८०४ मध्ये तूंबत आहे. महामार्गाला लागून असलेले सर्व नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने, रस्ते उंची जास्त झाल्याने, योग्य पाणी निचरा नियोजन नसल्याने हे सर्व होत आहे. वरणगाव नगरपरिषदेने तात्पुरते स्वरुपात पाणी निचरा होण्यासाठी मार्ग तयार केला. पण पुढे ते पाणी भोगावती नदीमध्ये जाण्यासाठी अडथळे आहेत. त्यामुळे परत प्रवाह मार्ग बंद करावे लागत आहेत.
पाणी साचल्यामुळे मला वैयक्तिक, आर्थिक तसेच मानसिक त्रास होत आहे. वासुदेव नेत्रालयाचे बांधकाम सुरु असल्याने सर्व बांधकाम साहित्य ते पाण्याखाली आहे. शिवाय ३५ ते ४० सिमेंट पोते ओलिताखाली आले आहेत. दैनंदिन काम करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. तसेच रेवा कुटी/,आश्रम हा पूर्ण पाण्याखाली आल्याने तेथील आश्रम आणि बागबगीचा धोक्यात आले आहेत.
याठिकाणी स्वत:हा पाहणी केली तर आपल्या लक्षात सर्व बाबी येतील.
१. सर्विस रोडला लागुन असलेले सर्व चेंबर/पूल जे पूर्वीपासून आहेत ते मोकळे करावेत.
२. सर्विस रोडला लागुन मोठी गटार तयार करून ते पाणी पुढे भोगावती नदी मध्ये जाण्यासाठी सक्षम मार्ग तयार करावा.
३. महालक्ष्मी नगरकडे जाण्याऱ्या रस्त्यावर जो आधीपासून नाला होता तो परत तयार करण्यात यावा.
४. लुम्बिनी नगर आणि गट क्र.८००,८०२ यांच्या मधून जाणारा ओढा जो जुन्या महामार्गाच्या खालून जात होता तो बुजाण्यात आलेला आहे,तो परत सुरु करण्यात यावा, असे या निवेदनात म्हंटले आहे.
आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा !
येत्या ७ दिवसात पाणी निचरा होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. जेणेकरून कोणालाही तुंबलेल्या पाण्याचा त्रास होणार नाही. अन्यथा २८ ऑक्टोबर २०२४, सोमवार पासून वरणगाव नगर परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसेल, असे डॉ. नितु पाटील म्हणाले.