जळगाव (प्रतिनिधी) प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमांतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम २०१८ आणि श्वानप्रजनन व विपणन नियम, २०१७ नुसार जिल्ह्यातील पाळीव प्राणी दुकान नियम, २०१८ आणि श्वान प्रजनन व विपणन केंद्र यांना संस्थाची नोंदणी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे करणे कायद्याने बंधनकारक आहे.
मात्र, नोंदणी न करता पेट शॉप व डॉग ब्रीडिंग सेंटर सुरु असल्याचे निर्दशनास आले आहे. संबंधितांनी आपली नोंदणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटीचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी महानगरपालीका, नगरपालिका व ग्राम पंचायत यांना दिले आहेत. नोंदणी करीता विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेमार्फत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांना सादर करावा. पेट शॉप नोंदणीसाठी अर्ज महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे सादर झाल्यानंतर संबधितास ३ महिन्यांकरीता तात्पुरता परवाना देण्यात येईल. जिल्हास्तरीय तपासणी समितीच्या अहवालानंतर ५ वर्षासाठी परवाना देण्यात येईल. तसेच श्वानप्रजनन व विपणन बाबतचा नोंदणी अर्ज केल्यानंतर सोबत जिल्हास्तरीय तपासणी समितीच्या अहवाल महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे सादर झाल्यानंतर संबधिताना २ वर्षासाठी परवाना देण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील पाळीव प्राणी दुकान आणि श्वानप्रजनन व विपणन केंद्र नोंदणीशिवाय अवैध ठरतात. त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई होवू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील पाळीव प्राणी दुकान आणि श्वानप्रजनन व विपणन केंद्रांनी नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी संयुक्तपणे केले आहे.