अहमदनगर (वृत्तसंस्था) यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ जगन्नाथ बोठे याच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट सापडली. बोठे यास पोलिसांना शनिवारी हैदराबाद येथून अटक केली. यावेळी पोलिसांना बोठेच्या खिशात सुसाईड नोट सापडल्याचे अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले. तसेच आरोपी बाळ बोठे याला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडचे अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडमधील प्रमुख सूत्रधार असलेला आरोपी बाळ बोठे याला अहमदनगरच्या पोलिसांनी जेरबंद करण्यात आलं. बाळ बोठेला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. बाळे बोठे ज्या रूममध्ये थांबला होता त्या रुमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते, अशी माहिती अहमदनगरचे पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसेच बाळ बोठे यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली होती. त्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख होता. तसेच त्यांचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास कोणाला संपर्क करावा, यासंदर्भातील माहिती सुसाईड नोटमध्ये देण्यात आली होती, असंही अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.
रेखा जरे यांची ३० नोव्हेंबरला नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट (ता. पारनेर) परिसरात गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा बोठे मात्र फरार झाला होता. बोठे हा हैदराबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहा पोलीस पथकांनी पाच दिवस हैदराबाद येथील बिलालनगर परिसरात शोध घेऊन बोठे याच्यासह त्याला मदत करणाऱ्या आरोपींना जेरबंद केले.
















