नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास ८ हजारांनी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत १८ हजार ७९५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर १७९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशात १८ हजार ७९५ बाधितांची नोंद झाली असून १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपासून देशातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील ३ लाखांपेक्षा कमी झाली आहे. देशात सध्या २ लाक ९२ हजार २०६ रुग्ण उपचाराधीन आहेत. नवीन रुग्णसंख्येसह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ३६ लाख ९७ हजार ५८१ झाली आहे. तर, आतापर्यंत ३ कोटी २९ लाख ५८ हजार २ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, ४ लाख ४७ हजार ३७३ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत १ कोटी २ लाख २२ हजार ५२५ जणांना कोरोना लस देण्यात आली असून आतापर्यंत ८७ कोटी ७ लाख ८ हजार ६३६ जणांचं लसीकरण झालंय.
राज्यातील स्थिती
राज्यात सोमवारी दिवसभरात २ हजार ८९५ रूग्ण कोरोनामधून बरे झाले असून, २ हजार ४३२ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, ३२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६३,६२,२४८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.२६ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४१,७६२ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३८९०२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.