मुंबई (वृत्तसंस्था) पैशा अभावी आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार करणे राज्य परिवहन मंडळाला शक्य झाले नव्हते. त्यासाठी राज्य सरकारने एस. टी. महामंडळाला एक हजार कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. पुढील सहा महिने ही मदत टप्प्याटप्याने मिळणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही घोषणा करण्यात येत आहे. परब हे राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले की आर्थिक अडचणीत आलेल्या एसटी मंडळाला या मदतीमुळे मोठाच हात मिळणार असून त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही पैसा उपलब्ध होणार आहे. पुढील सहा महिने हा पैसा उपयोगी पडणार आहे. एसटीचे प्रवासी दिवसेंदिवस वाढत असून लवकरच एसटी आपल्या नेहमीच्या मार्गावर येईल असे ते म्हणाले.
दरम्यान, गेल्या तीन महिन्यापासून प्रलंबित एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कोंडी अखेर फुटली आहे. सोमवारी एका महिन्याचे वेतनाची घोषणा केल्यानंतर मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर राज्य सरकारने एसटी महामंडळाला एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्याची घोषणा परिवहन मंत्री ऍड.अनिल परब यांनी केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सर्व महिन्याचे वेतन दिवळीपूर्वीच दिले जाणार आहे.
करोनाच्या काळात एसटी अनेक महिने बंद असल्याने एसटीला तब्बल तीन हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देणेही शक्य झाले नव्हते. एसटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार थकला होता. त्यातील एक महिन्याचा पगार वितरीत झाला असून उर्वरीत दोन महिन्यांचा पगार दिवाळीपुर्वी वितरीत केला जाणार आहे, असे परब यांनी स्पष्ट केले.
दरम्यान एसटी कर्मचारी संघटनांनी आक्रोश आंदोलन सुद्धा केले, त्याशिवाय वेतन मिळत नसल्याने 2 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केली आहे.