नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह भाष्य करणे गो-एअरच्या वैमानिकांना महागात पडलं आहे. या पायलटला विमान कंपनीनं बडतर्फ केलं आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या पायलटनं यापूर्वी हवाई दलामध्येही काम केले होते. पंतप्रधानांविषयी अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी पायलटला तात्काळ कामावरून निलंबित केलं असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
मिकी मलिक असं गोएअरने कामावरून काढून टाकलेल्या पायलटचे नाव आहे. मिकी मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर ट्विट करून टीका केली होती. मलिकच्या ट्विटवर आक्षेप घेत कंपनीने ही कारवाई केली. “पंतप्रधान मुर्ख आहेत. तुम्ही मलाही मुर्ख म्हणू शकता. मला वाईट वाटणार नाही. कारण की, मी पंतप्रधान नाही. पण पंतप्रधान मुर्ख आहेत,” असं अशी टीका मलिक यांनी ट्विटमधून केली होती.
एअरलाईन्सला व्यक्तीगत मताशी काहीही संबंध नाही
कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, एअरलाइन्सला गो एयरच्या कोणत्याही कर्मचार्याच्या वैयक्तिक मताशी संबंध नाही. गो-एअरने तातडीने संबंधित वैमानिकाची सेवा समाप्त केली आहे. या प्रकरणात गो एअरने वैमानिकाच्या ट्वीटपासून स्वत:ला दूर केले आणि वैमानिकाविरूद्ध कठोर कारवाई केली आहे. गोएअरने केलेली ही पहिलीच कारवाई नाही. यापूर्वी जून २०२०मध्येही कंपनीने एका प्रशिक्षणार्थी पायलटची हकालपट्टी केली होती. या पायलटने सीता आणि हिंदू धर्माविषयी वादग्रस्त ट्विट केल्याचा ठपका ठेवत कंपनीने ही कारवाई केली होती.
वैमानिकाने माफी मागितली
“पंतप्रधानांबद्दल आणि इतर काही आक्षेपार्ह ट्विटबद्दल मी माफी मागतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगीरी व्यक्त करतो. ट्विटमधून व्यक्त करण्यात आलेली मते वैयक्तिक होती. त्यांच्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या गोएअरचा कोणताही संबंध नाही,” असं सांगत मलिक यांनी माफीही मागितली आहे.