मुंबई (वृत्तसंस्था) ओबीसींना आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्य न्यायमूर्तींनी आज सुनावणी घेण्यास नकार दिल्यामुळे या याचिकेसह इतर याचिकांना क्लब करुन उद्या 8 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
याचिकाकर्त्यांनी आजच या संदर्भातल्या प्रलंबित याचिकेवर सुनावणी घेण्याची विनंती केली. पण मुख्य न्यायमूर्तींनी आज सुनावणी घेण्यास स्पष्ट नकार दिला. या याचिकेसह अन्य याचिकांना एकत्र करत उद्या म्हणजेच 8 नोव्हेंबरला सुनावणी होईल, असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. त्यामुळे उद्या मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.
काही माध्यमांतील वृत्तानुसार मराठा समाजाच्या वकिलांनी ओबीसी आरक्षणाच्या 23 मार्च 1994 च्या अध्यादेशाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं आहे. “महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द करा. ओबीसी आरक्षणाचे फेरसर्वेक्षण करा. तोपर्यंत घटनाबाह्य ओबीसी आरक्षणाला स्थगिती द्या”, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. बाळासाहेब सराटे, प्रशांत भोसले आणी शिवाजी कवठेकर अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.