नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून नांदेड गावात एसटी चालकाला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर २८ नोव्हेंबरपासून जळगाव व एरंडोल आगाराने नांदेड, साळवा व नारणे गावाकडे येणाऱ्या सर्व फेऱ्या बंद केल्या आहेत. या बसेस पूर्ववत सुरू करण्यासाठी युवा सेना (शिंदे गट) उपतालुकाध्यक्ष भरत सैंदाणे यांनी विभाग नियंत्रकांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
भरत सैंदाणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नांदेड परिसरातील बसेस गेल्या काही दिवसांपासून बंद केल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. चालकाला मारहाण प्रकरणात ग्रामस्थांचा काहीही संबंध नाही. यापूढे असा प्रकार गावात घडणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा नेहमीच सन्मान केला जातो. याचा आगाराने विचार करावा व सर्व बसेस पूर्ववत नियमित सुरू कराव्यात असेही नमूद केले.
निवेदन देताना भरत सैंदाणे, जि. प. चे माजी सदस्य प्रताप पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, नांदेड येथील शिवसैनिक व युवा सेनेच्या कार्यकर्ते उपस्थित होते. महामंडळ विभाग नियंत्रक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. युनियनशी चर्चा करून आणि पीडित चालकाचे मत घेऊन नांदेड येथील सामान्य नागरिकांचे आणि प्रवाशांचे होणारे हाल यामुळे एसटी सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
















