जळगाव (प्रतिनिधी) येथील रिध्दी जान्हवी फाऊंडेशनतर्फे दर वर्षाप्रमाणे निसर्गावरचे प्रेम दर्शविणारे असे झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून रिध्दी जान्हवी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा चित्रलेखा मालपाणी ह्या अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करीत आहेत. नैसर्गिक सौंदर्य,नैसर्गिक हवा,नैसर्गिक धन, संपत्ती,आरोग्य त्याबद्दल निसर्गाचे आभार मानून झाडांना राखी बांधून रिध्दी जान्हवी फाऊंडेशनच्या वतीने रक्षाबंधन साजरे करतात. ह्या वर्षीही त्यांनी झाडाचे पूजन करून झाडाला राखी बांधून सर्व नागरिकांना आवाहन केले की, आपण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड तरी लावावे. तसेच शेवटपर्यंत ते झाड वाढवून त्या झाडाला राखी बांधून त्याचे धन्यवाद करावे. कारण त्या झाडाने दिलेला ऑक्सिजन हा आपल्यासाठी मोफत दिलेला असतो. तोच ऑक्सिजन आपल्याला रुग्णालयात विकत घ्यावा लागतो. त्यामुळे आपण या निसर्गाचे आभार मानावे ते थोडेच आहे. म्हणून रिध्दी जान्हवी फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी अशा अनोख्या पद्धतीने झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले जाते. आज कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांमध्ये लहान मुलांचाही सहभाग पहावयास मिळाला. त्यांनी या उपक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. या मुलांना आतापासूनच झाडांचे महत्व पटल्याने भविष्यात निसर्ग प्रेमींच्या संख्येत नक्कीच वाढ होईल अशी आशा आहे, असे रिद्धी जान्हवी फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा चित्रलेखा मालपाणी यांनी म्हटले.