मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये सध्या गुलियन बॅरी सिंड्रोम हा श्वसनाशी संबंधित दुर्मिळ आजार आढळून येत आहे. मुंबईतील एका ४९ वर्षीय कोरोनाबाधित महिलेला गुलियन बॅरी सिंड्रोम हा आजार असल्याचे निदान झाले होते. कोरोनामुक्त रुग्णाला हा आजार होणं हे दुर्मिळात दुर्मिळ आहे.
परळ येथील ग्लोबल रुग्णालयातील डीबीएस प्रोग्रामचे सीनियर कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. पंकज अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने या महिलेवर यशस्वी उपचार केले आहेत. या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने २६ ऑक्टोबर रोजी तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४९ वर्षीय माधवी धारिया ही महिला रायगड जिल्ह्यातील महाड शहरात राहणारी आहे. या महिलेला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. या आजाराची सौम्य लक्षणं असल्याने या महिलेवर आणि तिच्या पतीवर घरीच उपचार करण्यात आले. परंतु तीन आठवड्यानंतर तिला पाठदुखीचा त्रास सुरु झाला. ऑर्थोपेडिक सर्जनद्वारे औषधोपचार सुरु होते. पण काही दिवसांनी चेहऱ्यांच्या एका बाजूला पक्षाघात झाला होता. या महिलेला चालता येत नव्हतं. प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुटुंबियांनी तिला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल केलं. परळ येथील ग्लोबल रुग्णालयातील डीबीएस प्रोग्रामचे सीनियर कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. पंकज अग्रवाल यांनी सांगितले की, “या महिलेला चालता येत नसल्याने व्हीलचेअरवर रुग्णालयात आणले होते. चेहऱ्यावर अशक्तपणा जाणवत होता, हातांनी काहीही पकडता येत नव्हतं, बोलताना शब्दही स्पष्ट उच्चारता येत नव्हते. अशा स्थितीत या महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणी अहवालात महिलेला गुलियन बॅरी सिंड्रोम हा विकार असल्याचं निष्पन्न झालं.