जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्ह्यात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी, २०२१ या कालावधीत ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सोमवार, १८ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे होणार आहे. असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, यांनी कळविले आहे.
या कार्यक्रमास समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, यंत्र अभियंता तथा विभाग नियंत्रक श्रावण सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या अभियानाच्या कालावधीत परिवहन विभाग व शहर वाहतुक शाखा यांच्यावतीने वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ हे ब्रीदवाक्य घेऊन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी शहर व जिल्ह्यातील नागरीकांनी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन गणेश पाटील, मोटार वाहन निरिक्षक, परिवहन विभाग व देविदास कुणगर, पोलीस निरिक्षक, शहर वाहतुक शाखा यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.