जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ अर्थात राज्य मार्केटींग फेडरेशनच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित दिलीपराव निकम यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर मुंबईहून ते जळगावात आल्यानंतर त्यांचे मित्र परिवार व भाजपातर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सहकारातील ज्येष्ठ नेत्या त्यांच्या आई शैलजादेवी निकम व पत्नी श्वेताताई निकम यांनी औक्षण करुन रोहित निकम यांचे स्वागत केले व फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. आजोबा बॅरिष्टर निकम यांनी जळगाव जिल्ह्यात सहकाराची जिल्हा सहकार बोर्डाच्या स्थापनेच्या रुपाने मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर वडील दिलीपराव निकम यांनी देखील सहकारात भरीव काम केले व आई शैलजादेवी निकम या राज्य मार्केटींग फेडरेशनवर संचालक होत्या. त्यानंतर केंद्र, राज्य व जिल्ह्याच्या इतर सहकारी संस्थांवर देखील शैलजादेवी निकम यांनी संचालकपद भुषविले. हाच सहकाराचा वारसा राजकीय पटलावरील समृद्धीकडे नेण्याचे काम रोहित निकम यांच्या रुपाने होत असून भाजपाला उमदा चेहरा मिळाला असल्याने रोहित निकम यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याच्या सहकाराच्या राजकीय पटलावर भाजपाचे नाव उमटले आहे. राज्य मार्केटिंग फेडरेशनचे निवनिर्वाचित संचालक रोहित निकम यांच्या स्वागताला भाजप व सहकार क्षेत्रातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
















